
शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन केली अनुदानाची मागणी
अमळनेर : केवायसी ऍप बंद असल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी प्रतिनिधीनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन अनुदानाची मागणी केली आहे.
२०२४ च्या खरीप हंगामात सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. संपूर्ण अमळनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अनेकवेळा मागण्या केल्यानन्तर १५८ सजांपैकी १२९ सजांचे पंचनामे करण्यात आले होते. २९ सजांचे पंचनामेच झाले नव्हते. शासनाने १२९ सजांसाठी ४५ कोटी रुपये अनुदान जाहीर केले होते. यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड , मोबाईल नंबर आणि बँक खाते अपडेट करणे आवश्यक होते. खाते केवायसी झाले पाहिजेत अशी अट होती. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून केवायसी ऍपच बंद असल्याने हजारो शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे अनुदान देखील मिळालेले नाही म्हणून शेतकरी प्रचंड संतापले आहेत. याबाबत किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील , सुरेश पाटील,देवेंद्र पाटील,सुखदेव पाटील,राजेंद्र पाटील, रतीलाल पाटील,आनंदा पाटील,प्रताप पाटील, विठ्ठल पाटील , संभाजी पाटील ,प्रकाश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार राजेंद्र ढोले यांना निवेदन देऊन वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून केवायसी ऍप सुरू करण्याची मागणी केली आहे.




