
बैलगाडी शर्यतीत वडाळे येथील माऊली व महाकाल या बैलजोडीने पटकावला प्रथम क्रमांक…
अमळनेर : एकतेचे प्रतीक असलेल्या आणि ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या कन्हेरे येथील चिंचदेवी यात्रेला बुधवार १२ पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत वडाळे येथील समाधान आमले यांच्या माऊली व महाकाल या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाऊन ३१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.
यात्रोत्सवाचा थोडक्यात इतिहास असा आहे. जयसिंगराव यांची ११०५ मध्ये मध्यप्रदेशातील मांडवगड येथे सत्ता होती. त्यांना मानाजी राव पुत्र होता. आणि मानजीराव याना रावजी आणि भावजी ही दोन मुले होती. पुढे ते मांडवगड येथून विजयगडला आले. तेथून शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे व नंतर अमळनेर तालुक्यात कन्हेरे येथे आले. १६०५ मध्ये त्यांनी चामुंडा उर्फ चिंचदेवीची स्थापना केली आणि मंदिराच्या शेजारीच गयबानशाह बाबा ची कबर आहे. विशेष म्हणजे गावात एकही मुस्लिम नागरिक नाही तरी अष्टमीला चिंचदेवी यात्रा आणि नवमीला गयबानशाह बाबांचा उरूस अशी एकत्र दोन दिवस यात्रा भरते. हिंदू मुस्लिम भाविक आनंदाने नवस फेडायला येथे येतात. ही यात्रा म्हणजे एकतेचे प्रतीक आहे.
दोन्ही दिवस बंडू नाना धुळेकर , शांताराम चव्हाण दहिवदकर , अनिताराणी अमळनेरकर , व रतनभाऊ व सोमनाथ भाऊ नगरदेवळेकर यांचा तमाशा होणार आहे. यात्रेत विविध खाद्य पदार्थ ,घरगुती वस्तू , खेळणी ,पाळणे आदी दुकाने थाटलेली असतात. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले सर्व गावकरी यात्रेला एकत्र जमतात.
बैलगाडी शर्यतीत दुसरा क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षीस म्हसवे येथील शंकर ओपनर यांनी , तिसरे ११ हजाराचे बक्षिस भडगाव येथील शिवकृपा गटाने , चवथे बक्षिस ७ हजार रुपयांचे भारत आणि प्रदीप शेठ यांच्या जोडीने , पाचवे बक्षिस पिंपळकोठा येथील शिवराय ग्रुप व कासोदा येथील जय हनुमान ग्रुप यांनी , सहावे बक्षीस कॅम क्लब वडाळा आणि सोन्या ग्रुप भातखेडा यांनी मिळवले आहे.




