
अमळनेर : स्थगित केलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक प्राधिकरण ने ४ रोजी दिले आहेत. मात्र एकाचवेळी निवडणुकांची गर्दी होईल आणि कर्मचाऱ्यांवर ताण पडेल म्हणून निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता आहे. अमळनेर तालुक्यात शेतकी संघासह ४० सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने ३० सप्टेंबर पर्यंत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्यानंतर राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने पुन्हा ३१ ऑक्टोबर पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या संस्था वगळून ज्यां अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यांनी प्राधिकरण कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच क वर्ग संस्थांच्या निवणुकांना तालुकास्तरावर मंजुरी देण्यात यावी. १ नोव्हेंबर २०२५ ही अहर्ता दिनांक ग्राह्य धरून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी. ही अहर्ता दिनांक फक्त तीन महिन्यांपर्यंत वैध असेल.
अमळनेर तालुक्यात शेतकी संघ ही मोठी संस्था आहे या संस्थेच्या जनरल मतदार संघाची १६ हजार मतदारांची प्रारूप यादी जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवण्यात आली आहे. विविध संस्थांच्या १६८ ठरावांची यादी अद्याप पाठवायची आहे. तसेच विविध सुमारे २० सहकारी संस्थांची निवडणूक देखील होऊ घातली आहे.
दरम्यान राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ४ रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे आदेश काढले आहेत आणि त्याच दिवशी पालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. अमळनेर शेतकी संघाने निवडणुकीसाठी दहा लाख भरले आहेत. एकूण सोळा लाख रुपये भरायचे आहेत. एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान राज्य निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार सहकारी संस्थावर प्रशासक नेमले होती त्यांची मुदत संपुष्टात आली आहे.




