
निवडणुकीत मलिदा लाटून मागील नुकसान भरून काढण्यासाठी तो नेता शहरात दाखल ?
अमळनेर – अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत अर्ज भरण्याचा तिसरा दिवस उगवला तरी कोणत्याही आघाडी वा पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
तालुक्यात शहर विकास आघाडी, भाजप, दोन्ही शिवसेना यांनी इच्छुकांसाठी स्वतंत्र मुलाखतीचे आयोजन केल्यानंतर अद्याप ही शहर विकास आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपच्या झेंड्याखाली न लढता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल, असे खासदार स्मिता वाघ यांनी अद्यापही स्पष्ट केले नाही. तसेच शिवसेना शिंदे गट ही स्वतंत्र लढेल का ? यावर प्रश्नचिन्ह आहे. निवडणूक हातातोंडाशी आली असताना कोणत्याच आघाडी व पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे काहींनी अद्यापही प्रचाराला सुरुवात केलेली नाही. तसेच माजी नगराध्यक्षा ही निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाल्याने त्या प्रभागातील इतर इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत. अनेकांची द्विधा मनस्थिती झाल्याने नेत्यांनी लवकरात लवकर अधिकृत उमेदवारांची घोषणा करावी अशी मागणी आता होत आहे.
मोठा मलिदा लाटण्यासाठी तो नेता शहरात दाखल…
निवडणुकीच्या तोंडावर शहरात दाखल झालेला नेता कशासाठी आला ? असा प्रश्न अनेकांना पडला असताना निवडणुकीच्या तोंडावर गोळा होणाऱ्या मालिद्यात वाटेकरी होण्यासाठी अमळनेर वाऱ्या सुरू झाल्याची माहिती आतल्या गोटातून मिळाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या मोठ्या नुकसानाची तूट भरून काढण्यासाठी हा सिजनेबल नेता पुन्हा सज्ज झाला आहे. मात्र ह्या पत संपलेल्या नेत्याला किती महत्व द्यावे ? हे सत्ताधारी नेत्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. भविष्यात सत्ता बदल झाल्यास हा नेता विरोधी गटाला आशीर्वाद देताना दिसला तर किमान जनतेला तरी आश्चर्य वाटणार नाही.




