
अमळनेर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामीण भागातील निवासी मालमत्ता धारकांनी थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास त्यांना चालू वर्षाचे मालमत्ता करातही ५० टक्के सवलत देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत व पंचायत राज अभियान विभागाचे उपसचिव क श्री पोतदार यांनी १३ रोजी जाहीर केला आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेऊन हा जनहिताचा निर्णय घ्यायला लावू अशी माहिती गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी दिली.

समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी ग्रामपंचायतींचे आर्थिक स्वावलंबन अत्यावश्यक आहे. तथापि ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने १०० टक्के वसुली होत नाही. आणि विविध विकासकामे करायला अडचण येत आहे. म्हणून थकीत झालेली कर वसुलीला गती यावी आणि वसुलीची रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निवासी मालमत्ता कर आणि अन्य करांच्या वसुलीत सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामपंचायतीतील २०२५ – २६ आर्थिक वर्षाचा मालमत्ता, दिवाबत्ती आणि पाणी पट्टी कर तसेच १ एप्रिल २०२५ पर्यंतचा थकबाकी कर एकरकमी भरल्यास संपूर्ण करात ५० टक्के सवलत देण्याची योजना अंमलात आणण्याचा निर्णय १३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. ही सवलत फक्त निवासी मालमत्तासाठी आहे. वाणिज्य , औद्योगिक किंवा इतर मालमत्तांसाठी नाही.
करात सवलत देण्याचा निर्णय प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ऐच्छिक असून त्यांनी विशेष ग्राम सभा बोलावून तसा ठराव करणे अनिवार्य आहे. सवलत दिल्यामुळे ग्रामपंचायतींना येणारी घट बाबत शासन कोणतीही नुकसान भरपाई देणार नाही.
सवलतीत एकरकमी भरणा करून घेतल्यास ग्रामपंचायतींना एकत्र निधी उपलब्ध होणार आहे. विकास कामांसाठी ती रक्कम उपयुक्त ठरेल आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचा देखील फायदा होणार आहे.
प्रतिक्रिया…
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा बोलावून जनतेचा फायदा करून वसुलीचा फायदा समजावून ही योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न असतील.-एन आर पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर
प्रतिक्रिया…
गांधली येथे ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांच्या सल्ल्याने गावकऱ्यांना मालमत्ता ,पाणी पट्टी , आणि दिवाबत्ती करात सवलत दिली जाईल. पंचायतीचे उत्पन्न कमी झाले तरी ग्रामस्थांवर कुठलीही थकबाकी नसेल.- नरेंद्र पाटील , सरपंच, गांधली ता अमळनेर




