
शहर विकास आघाडीचे जागांवरून अडले घोडे, उमेदवारांत चलबिचल…
अमळनेर:- १७ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही कोणत्याच पक्ष व शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले नाहीत. भाजप शहर विकास आघाडीत सामील होणार का ? यावर ही अद्याप प्रश्नचिन्हच आहे.

आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी आता मात्र जागा वाटपावरून घोडे अडल्याने पेच निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक सातची जागा आणि उपनगराध्यक्ष पदावरून आमदार व खासदार यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा शहरभरात रंगत असून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवस तोंडावर आला तरी अधिकृत उमेदवार यामुळे घोषित होऊ शकले नाहीत. त्यामुळे अनेक इच्छुकांचे देव पाण्यात असून आघाडी होणार की फिस्कटणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उद्यापर्यंत अधिकृत उमेदवार घोषित झाले तरी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवल्यामुळे काहींचा हिरमोड होणार असल्याचे नक्की असून अनेक प्रभागात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.




