
सूचनांचे पालन न केल्याने ओढवली नामुष्की, दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ?
अमळनेर: आरोपीच्या आजारी पडण्याच्या नाटकाला पोलीस बळी पडून पाणी पाजण्यासाठी बेडी उघडल्याने मोटारसायकली चोरणारे दोन्ही आरोपी अमळनेर पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याची घटना नंदुरबार रस्त्यावरील शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या सुचनेची अंमलबजावणी न केल्याने त्यांच्यावर आता निलंबनाची वेळ आली आहे.

अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरातून २४ मोटारसायकली चोरणारे हिंम्मत रेहंज्या पावरा (वय ३२) व अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खर्डे (वय २७ रा सातपिंप्री ता शहादा जिल्हा नंदुरबार) यांना अटक केली होती. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जळगाव कारागृहात जागा नसल्याने आरोपीना नंदुरबार जिल्हा कारागृहात जमा करण्याचे आदेश दिले होते. या आरोपीना नंदुरबार येथे नेण्यासाठी अमोल पंडित करडयीकर व यशकुमार रवींद्र सपकाळे या दोघा पोलिसांना वॉरंट देण्यात आले. आरोपीना शासकीय वाहनातून नंदुरबार नेत असताना धावडे गावाच्या पुढे अंबालाल ने मला कसे तरी होतेय म्हणून नाटक केले आणि डोळे बंद केले. पोलिसांनी हॉटेल नयन समोरील चहाच्या टपरीवर गाडी थांबवून सपकाळे याने खाली उतरून पाण्याची बाटली आणली. अंबालाल च्या डोळ्यावर पाणी मारले तरी तो डोळे उघडत नव्हता म्हणून अमोल करडईकर याने हाताची बेडी उघडून त्याला पाणी पाजायला सुरुवात केली. त्याचवेळी शेजारी बसलेला हिम्मत पावरा हा बेडीसह पळू लागला. त्याला पकडण्यासाठी पोलीस अमोल पलीकडे धावला तोपर्यंत इकडे आजारी चे नाटक करणारा अंबालाल देखील झटका मारून पळू लागला. सपकाळे त्याला पकडायला धावला त्याने त्यालाही झटका मारला व शेतात पळून गेला. इकडे हिम्मत पावरा रस्त्याच्या पलीकडे धावत असतांना त्याला अमोल ने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दोनदा अमोल च्या हाताला झटके मारून निसटून गेला आणि शेतांमध्ये पळून गेला. गावकऱ्यांच्या मदतीने आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते आढळून आले नाहीत. अमोल च्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम २६२ ,३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सूचना न ऐकल्याने फसले !
काही दिवसांपूर्वीच अमळनेर हद्दीतून एलसीबी पोलिसांच्या तावडीतून दोन आरोपी बेडयांसह पसार झाले होते. त्यामुळे अमळनेरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलिसांना सूचना दिल्या होत्या की दोघांना वेगवेगळ्या बेड्या लावा आणि एक कडी गाडीच्या दांड्याला बांधून हात वरती लटकवून ठेवा. मात्र दोन्ही पोलिसांनी या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याचेही समजते. त्यात आरोपीना पाणी पाजण्यासाठी बेडी उघडली त्यामुळे दोघांनाही पळून जाण्याची संधी साधली. पोलिसांचे दुर्लक्षच त्यांना नडले.
निलंबनाची कारवाई होणार !
दरम्यान याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डीवायएसपी विनायक कोते याना माहिती १५ रोजीच कळवली आहे. दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.




