
अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथे पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूच्या तीन हातभट्ट्या उध्वस्त करून ९१ हजार ५०० रुपयांची दारू व साहित्य जप्त केल्याची घटना १५ रोजी सकाळी घडली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की , देवगाव देवळी येथे गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू आहेत. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील ,मिलिंद सोनार , सिद्धांत शिसोदे , प्रशांत पाटील , उज्वलकुमार म्हस्के याना हातभट्ट्या वर कारवाई साठी पाठवले. पोलीस पथकाने देवगाव देवळी येथे मीराबाई नागराज भिल वय ६० हिच्या घरामागे दारू तयार करताना सापडली तिच्याजवळ ३२ हजार रुपयांचे १०० लिटर नवसागर मिश्रीत कच्चे रसायन , १०० लिटर पक्के रसायन व २० लिटर दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य आढळून आले. तसेच छगन जामराव भिल वय ५० हा देखील त्याच्या घरामागे दारू तयार करताना आढळून आला. त्याच्या कडे १५० लिटर गुळ मोह चे कच्चे रसायन , १०० लिटर पक्के रसायन व २० लिटर गावठी दारू , आणि प्लास्टिक ड्रम असे २७ हजार रुपयांचे साहित्य आढळून आले. लागलीच सखाराम लालचंद भिल वय ४५ हा देखील त्याच्या घराजवळ दारू तयार करताना आढळून आला . त्याच्याजवळून १०० लिटर कच्चे रसायन ,१०० लिटर पक्के रसायन ,२५ लिटर दारू आणि साहित्य असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी तिन्ही हातभट्ट्या उध्वस्त करून रसायन फेकून दिले. पंचनामा करून दारुचे नमुने जप्त करून तिघांना ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदा ६५ (फ)(ब)(क)(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




