
समर्थकांत जल्लोष, सक्षम व विजयी होणारा उमेदवार दिल्याने नेतृत्वाचे अनेकांनी केले अभिनंदन
अमळनेर:- येथील नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर होताच शहरभर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी याबाबत आघाडीच्या नेत्यांचे सक्षम उमेदवार दिल्याबद्दल अभिनंदन केले असून आजच सोशल मीडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव सुरू झाला आहे.

जितेंद्र ठाकूर हे पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा आणि नागरिकाभिमुख उपक्रमातून सातत्याने कार्यरत आहेत. शहरातील समस्यांची जाण, नागरिकांशी थेट संवाद, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना जोडून घेण्याची क्षमता या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते एक प्रबळ, प्रभावी आणि सक्षम उमेदवार म्हणून पाहिले होते. त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब होताच शहर विकास आघाडीकडून “योग्य उमेदवाराला संधी” मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. अनेकांनी तर आजच गुलाल टाकून घ्यावा असे म्हणत जल्लोष केला.
नेतृत्वाचे आभार आणि अभिनंदन…
या उमेदवारीमुळे शहर विकास आघाडीच्या नेतृत्वाचेही मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात आले. प्रबळ आणि लोकमान्य उमेदवाराला संधी दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, तसेच माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय शहराच्या प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आघाडीने प्रबळ उमेदवार देताच नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले आहे. प्रतिस्पर्ध्यांमध्येही यामुळे खळबळ उडाली असून या निवडणुकीत एकतर्फी लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे शहर विकास आघाडीला नवचैतन्य लाभले असून, नागरिकांमध्ये “शहर विकासाच्या दिशेने सकारात्मक बदल” होण्याची अपेक्षा वाढली आहे.




