
अमळनेर:- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी अमळनेर येथे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या थरकाप उडवणाऱ्या घटनेने फक्त जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. डोंगराळे (ता. मालेगाव) येथे पाच वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून करण्यात आला. या निर्घृण कृत्यामुळे मालेगाव आणि परिसरासह महाराष्ट्रात तीव्र संताप उसळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातच संतापाची लाट उसळली आहे. या आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी अमळनेर येथील दि सोनार सराफ असोसिएशन, हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन, सुवर्णकार मित्र मंडळ यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी व अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले व सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्व सुवर्णकार बांधव, पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते.




