
डीवायएसपी पथकाने दहा किलो ५९० ग्रॅम गांजा व २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…
अमळनेर : शहरात मोटरसायकलवर गांजा विक्री साठी आणणाऱ्या शिरपूर तालुक्यातील तरुणाला डीवायएसपी पथकाने रंगेहाथ पकडून त्याच्या कडून दोन लाख दहा हजार रुपयांचा दहा किलो ५९० ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण २ लाख ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीवायएसपी विनायक कोते याना १७ रोजी माहिती मिळाली की नंदगाव रस्त्यावरून अमळनेर कडे एक जण मोटरसायकल क्रमांक एम एच १८ सी डी ७३२६ हिच्यावर गांजा आणत आहे. डीवायएसपी कोते यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , गणेश पाटील , उज्वल पाटील ,शेखर साळुंखे ,नितीन मनोरे ,समाधान सोनवणे याना घेऊन तांबेपुरा शिवारात बोरी नदीच्या पुलाजवळ आपली वाहने मंदिर परिसरात पार्क करून नंदगाव रस्त्यावर दबा धरून बसले. दुपारी ३:३५ वाजता नमूद क्रमांकाच्या मोटरसायकलवर एक तरुण पांढऱ्या रंगांची गोणी घेऊन येताना दिसला. डीवायएसपी कोते यांनी त्याला अडवून त्याची चौकशी आणि गोणी तपासली असता त्याच्या ओलसर बिया आणि बोंडे असलेला सुमारे २ लाख १० हजार किमतीचा १० किलो ५९० ग्राम गांजा आढळून आला. त्याने त्याचे नाव भोजु सुरेश पवार वय ३४ रा बभळाज ता शिरपूर असे सांगितले. फॉरेन्सिक पथकासमोर पंचनामा करून त्याच्याकडून गांजा आणि त्याची ८० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण २ लाख ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८, २० ,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.




