
पातोंडा येथील दुर्दैवी घटना, एका वर्षात दोन्ही भावांचा झाला मृत्यू…
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा येथील तरुणाचा मका काढतांना गळ्यातील रुमाल थ्रेचर मशीन मध्ये अडकल्याने गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन सुरेश बिरारी (वय ३६) असे मयत विवाहित युवकाचे नाव आहे.

सविस्तर असे की येथील अल्पभूधारक शेतकरी सुरेश रामदास पाटील यांचे खवशी रस्त्यालगत नांद्री शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी खरीप हंगामात मका लागवड केली होती. मागील महिन्यात सततच्या पावसामुळे व कमी बाजारभावामुळे त्यांनी मका पीक कापून शेतात मकाच्या ढीग केला होता. काल दि.२१ शुक्रवारी रोजी सकाळी सुरेश रामदास बिरारी यांचा मुलगा नितीन हा भाड्याने मका काढण्याचे मशीन व ट्रॅक्टर घेऊन मका काढत होता. मक्याचे दाणे शेतात पडत असल्याने तो मका काढण्याच्या मशीन खाली पाल टाकत होता असे समजले. त्याच वेळी त्याच्या गळ्यातील लांब रुमाल मका काढण्याच्या थ्रेचर मशीन च्या ब्लोअर मध्ये अडकला व काही कळण्याच्या आतच त्याच्या मानेला जोराचा गळफास लागला. त्याला उपचारासाठी अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशन मध्ये दाखल करण्यात होते. उपचार सुरू असताना आज दि.२२शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.त्याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आज दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी , एक लहान मुलगा व एक लहान मुलगी होत.नितीन वर घराची संपूर्ण जबाबदारी होती. घरातील एकमेव कर्ता पुरुष होता. गावातील होतकरु व मनमिळाऊ युवक गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
एका वर्षात दोन्ही भावांचा मृत्यू
दहा महिन्यापूर्वी नितीन बिरारी याच्या मोठा भाऊ योगेश बिरारी याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी नितीन वर होती.आता नितीन ही सोडून गेल्याने आई, वडील यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




