
मांडळ नदीपात्रातील घटना, दोन ट्रॅक्टर व जेसीबी वाळूमाफियांनी नेले पळवून…
अमळनेर:- गेल्या दीड वर्षापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असून आता अनेकांच्या आशीर्वादाने पोसलेला भस्मासुर उलटला आहे. ट्रॅक्टर पकडण्यास गेलेल्या महसूल पथकावरच हल्ला करून मंडळ अधिकाऱ्याच्या डोक्याला गावठी कट्टा लावून ट्रॅक्टर व जेसीबी पळवून नेल्याची थरारक घटना ७ रोजी पहाटे १ च्या दरम्यान घडली आहे.
मांडळ येथे भरदिवसा वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून महसूल पथक पाठवण्यात आले होते. त्यात मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, पवनकुमार शिनगारे, दीपक पाटील यांचा समावेश होता. गस्त घालत असताना पहाटे १ च्या सुमारास मांडळ येथील पांझरा नदीत गावविहिरीजवळ एक जेसीबी (क्रमांक एमएच १५ बीडब्लू ९४५९), एक निळ्या रंगाचे व एक हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर विना क्रमांकाचे वाळू उपसा करताना दिसून आले. महसूल पथकाने नदीत उतरून दोन्ही ट्रॅक्टर चालक व जेसीबी चालकांना ओळख दाखवली. दोन्ही ट्रॅक्टर व जेसीबी तहसील कार्यालयात नेण्याबाबत सूचना देत असताना त्याठिकाणी तोंडावर रुमाल बांधलेले १० ते १२ जण लाठ्या काठ्या घेऊन आले व शिवीगाळ करत जेसीबी व ट्रॅक्टर सोडून द्या अन्यथा तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यातील एकाने जितेंद्र पाटील यांच्या तोंडावर स्प्रे मारला व दुसऱ्याने त्यांच्या काठीने पायावर मारले. त्यानंतर एकाने गावठी कट्टा काढत मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळाला लावत दाखवत म्हणाला की, आता जर तुम्ही येथून निघाला नाहीत तर तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी देऊन दोन्ही ट्रॅक्टर व जेसीबी पळवून नेले. त्यानंतर पुरुषोत्तम पाटील यांनी घडलेला प्रकार प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या कानावर घालत मारवड पोलिस ठाणे गाठत जेसीबी चालक, ट्रॅक्टर चालक व अनोळखी १० ते १२ जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पवार करीत आहेत.
कडक कारवाईची अद्याप प्रतीक्षा…
गेल्या दीड ते दोन वर्षात अनेकांच्या आशीर्वादाने वाळू माफियांची चांदी झाली असून आता पोसलेला भस्मासुर उलटू लागला आहे. त्यामुळे आता तरी जागे होऊन महसूल व पोलिस प्रशासनाने एकत्रितरित्या मोहीम राबवून कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वाळू प्रश्नी तहसीलदारांसह पोलिस प्रशासनाकडून ही दुर्लक्ष
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत चार महिन्यापूर्वी झालेली ग्रामसभा वाळू चोरीच्या विषयावरून चांगलीच गाजली होती. त्या ग्रामसभेत अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या तोंडावर केला होता. मात्र तरीही महसूल पथकांनी ढिलाई केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वाळू वाहतूक अविरत सुरू होती. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हे वाळू बाबतीत कणखर भूमिका घेत नसल्याचे आरोप त्यांच्यावर असून ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर ते चालवत घेऊन येत फुकटची पब्लिसिटी घेत असल्याचे प्रकार दोन तीन वेळा घडले आहेत. तसेच शासननिर्णयानुसार पकडलेल्या गौण खनिज वाहनावर कारवाई न करता शास्ती लावून सोडून देण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. आता प्रांताधिकारी नव्या दमाचे असल्याने त्यांच्याकडून कडक अंकुश ठेवला जाईल अशी आशा व्यक्त होत आहे.




