
प्रेमी युगुलांच्या पालकांना बोलावून समज देत दिले ताब्यात
अमळनेर : शाळा कॉलेज सोडून शहराबाहेर निर्जन स्थळी प्रेम चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने धडक कारवाई केली. मुलांच्या पालकांना बोलावून त्याना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली तसेच तरुणी पळून जाण्याचे प्रमाण वाढले होते. शाळा महाविद्यालयाचे अल्पवयीन मुले मुली अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, सानेगुरुजी स्मारक, डुबकी मारोती, शहराबाहेरील मंदिरे,शिवाजी बगीचा आदी ठिकाणी तसेच काही निर्जन स्थळी शाळा महाविद्यालय सोडून प्रेमचाळे करीत असल्याची ओरड होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी याबाबीची गांभीर्याने दखल घेत दामिनी पथकाला सक्रिय केले. पोलीस निरीक्षक निकम यांनी मोनिका पाटील ,नम्रता जरे, श्यामल पारधी, मिलींद सोनार, गजेंद्र पाटील यांना प्रेमी युगुलांवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानन्तर पथकाने ६ रोजी दुपारी अंबर्शी टेकडीवर झुडुपात प्रेम चाळे करणाऱ्या तीन जोडप्यांवर कारवाई केली. गलवाडे येथील दोन मुली , व धुळे येथील रहिवासी असलेली मात्र अमळनेरात आपल्या नातेवाईकांकडे शिकणारी एक मुलगी आणि दोंडाईचा येथील दोन तरुण तसेच गडखांब येथील एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे तिन्ही युगुल आपले शाळा महाविद्यालय सोडून याठिकाणी आल्याचे समजताच दामिनी पथकाने सहाही जणांना आपला हिसका दाखवला. त्यांना अमळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांची सखोल चौकशी करून सर्वांच्या पालकांना बोलावून मुला मुलींना समज देऊन त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या कारवाईनंतर पालकांनी समाधान व्यक्त केले.
प्रतिक्रिया…
शहरात अथवा शहराबाहेर कोणताही गैरप्रकार होत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. तसेच पालकांनी आपली मुले शाळा महाविद्यालयात किती वेळ जातात ,कुठे जातात याची सातत्याने चौकशी केली पाहिजे. – दत्तात्रय निकम ,पोलीस निरीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन




