
अमळनेर :- खानदेश शिक्षण मंडळ अमळनेरच्या २०२५-२०२८ या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दि. ४ जानेवारी २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यानिमित्त निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर फोटोग्राफर व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.


मतदारांच्या अचूक ओळखीकरिता मतदानाच्या दिवशीच सभासदांची नाव, फोटो, मतदार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पत्त्यासह संपूर्ण माहिती संकलित करण्यात यावी, असा प्रस्ताव अर्जदार अरुण पाटील (शहराध्यक्ष – राष्ट्रवादी ओबीसी सेल, अमळनेर) यांनी मंडळाकडे सादर केला आहे.
पूर्वी मतदार यादी फोटोसहित अद्ययावत करण्याचे काम एका खाजगी संस्थेमार्फत झाले असले तरी अद्याप अनेक ठिकाणी यादी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेतल्यास येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी अधिक अचूक व सुबक मतदार यादी तयार होईल, असे अर्जात नमूद केले आहे.
मतदान प्रक्रियेत बोगस मतदानाला आळा बसावा आणि संपूर्ण निवडणूक शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडावी, याकरिता प्रत्येक बुथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक असल्याचा आग्रहही करण्यात आला आहे.या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





