
अमळनेर : रब्बी हंगामातील पेरण्या पूर्णत्वाला जात असताना मागील आठवड्यातील वाढलेल्या थंडीचा चांगला फायदा हरभरा सहित इतर पिकांना झाला आहे. हरभरा पिकावर घाटे अळीचे नियंत्रण करण्याचा सल्ला कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी ए. एस. खैरनार यांनी केले आहे
मागील दोन तीन दिवस बारीक ढगाळ वातावरणाचा तयार झाले होते. त्यामुळे या बदलत्या हवामानात कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळल्यास तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


सद्यस्थितीत हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी वाढताना दिसत असल्याने तिच्या नियंत्रणासाठी खालील उपाय प्रभावी मानले जातात
शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत. सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना ५% निंबोळी अर्क किंवा अझाडीरेकटीन ३०० पीपीएम – ५० मिली प्रति १० लिटर पाणी फवारावे. अळी लहान अवस्थेत असताना एच ए एन पी व्ही विषाणू ५०० – १० मिली प्रति १० लिटर पाणी (प्रति एकर २०० मिली) फवारणी करावी.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास पुढीलपैकी एक कीटकनाशक फवारावे
इमामेक्टिन बेंझोएट ५% – ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी (प्रति एकर ८८ ग्रॅम)
क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% – ३ मिली प्रति १० लिटर पाणी (प्रति एकर ६० मिली)
फ्लुबेंडामाईड २०% – ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी (प्रति एकर १२५ ग्रॅम) आदींनी रोग नियंत्रण करावे.





