
अमळनेर : शहरातील परिचित सर्पमित्र, निसर्गप्रेमी आणि प्रखर समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे श्री गणेश नारायण शिंगारे यांनी आज त्यांच्या ११३ व्या वेळेस रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी कार्य ठेवले आहे. सतत, निःस्वार्थीपणे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले त्यांचे हे योगदान अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे.


कोविडच्या भीषण काळात, जेव्हा सर्वत्र भीतीचे वातावरण होते आणि रक्ताची तीव्र कमतरता निर्माण झाली होती, त्यावेळीदेखील शिंगारे यांनी धैर्याने आणि जबाबदारीने नियमित रक्तदान करत अनेकांना नवी आशा दिली होती.
याचबरोबर, गणेश शिंगारे आणि त्यांची पत्नी सौ. किरण गणेश शिंगारे यांनी मानवतावादी भूमिकेतून मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून समाजासमोर आणखी एक उच्च आदर्श निर्माण केला. गणेश शिंगारे हे नगर परिषद, अमळनेर पाणी पुरवठा विभागात फिल्टर इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत असून, शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी देखील मनापासून जपत आहेत.
सर्पमित्र म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहर व परिसरातील असंख्य सर्पांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या अमूल्य सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, नागरिक तसेच मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


