
अमळनेर : पालिकेच्या कचरा डेपोला अचानक आग लागल्याची घटना १५ रोजी दुपारी २:३३ वाजेच्या सुमारास घडली वेळीच पालिकेचे तिन्ही अग्निशमन बंब पोहचल्याने आग आटोक्यात आली. वृक्ष वाचवण्यात यश आले आहे.
दुपारी अमळनेर शहराबाहेर अंबर्शी टेकडीच्या मागे असलेल्या कचरा डेपोला आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना मिळताच त्यांनी तातडीने अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख,जफरखान पठाण, सत्यन संदानशिव आकाश संदानशिव लखन कंखरे आकाश बाविस्कर याना बंम्ब घेऊन पाठवले. तिन्ही बंम्ब एकाचवेळी त्याठिकाणी पोहचल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाणी मारणे सुरू केले.
काही ठिकाणी कचरा कोरडा असल्याने आग वाढत चालली होती. मात्र कचरा डेपोत काम करणाऱ्या महिलांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी कचरा खंडित करण्याचे काम केले. त्यामुळे आगीवर पटकन नियंत्रण मिळवता आले. अंबर्शी टेकडीच्या मागे सुद्धा मोठया प्रमाणावर झाडे लावण्यात आली होती. आग आटोक्यात आली नसती तर लावलेली झाडे सुद्धा जळाली असती. टेकडी ग्रुप आणि वृक्ष प्रेमींनी अग्निशमन दल आणि कामगार महिलांचे कौतुक केले आहे.




