
अमळनेर:- तालुक्यातून तरुणी आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दहा दिवसात चार तरुणी व एक विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचा ही समावेश आहे.
शहरातील ढेकू सीम रोडवर राहणारी १८ वर्षीय तरुणी १२ रोजी रात्री १० ते १३ रोजी सकाळी ५ या वेळेदरम्यान बेपत्ता झाल्याची तक्रार १३ रोजी अमळनेर पोलिसात करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हेकॉ विनोद भोई हे करीत आहेत. तसेच शहरातील १९ वर्ष २ महिने वय असलेली तरुणी १३ रोजी सकाळी ५ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. याबाबत तिच्या वडिलांनी अमळनेर पोलिसांत फिर्याद दिली असून तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत. १५ रोजी सकाळी ११:४५ वाजता शहरातील एका इंग्लिश मिडीयम स्कूलमधून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी अमळनेर पोलिसांत केली आहे.
तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्ष ५ महिने वय असलेली तरुणी बेपत्ता झाली असून ही १६ डिसेंबर रोजी सकाळी कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. दुपारी तरुणी ही बकऱ्या चारण्यासाठी शेतातच थांबली होती.नंतर ती घरी न परतल्याने शेतात शोध घेतला असता तरुणी आढळून आली नाही. घटनास्थळी तिची चप्पल सापडली असून गावात व परिसरातील शेतात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेल्याची फिर्याद दाखल केली असून पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील २९ वर्षीय विवाहित महिलेचे पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरीच राहत होती. ६ डिसेंबर रोजी ती गडखांब येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती. ७ रोजी मी धुळे येथे जाऊन येते असे सांगून ती गडखांब येथून निघाली. मात्र आजपावतो तिचा काहीच तपास न लागल्याने सदर महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी अमळनेर पोलिसांत दिली आहे. पुढील तपास हेकॉ सुनील जाधव करीत आहेत.




