
अमळनेर : तालुक्यातील खरीप हंगाम २०२५ दरम्यान विहित मुदतीत ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्र. लवेसु-2025/शिकना/प्र.क्र.3/भुमापन दिनांक १४ डिसेंबर २०२५ अन्वये, ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने ई-पीक नोंद करणे शक्य झालेले नाही, त्यांच्यासाठी ऑफलाईन पीक पाहणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पीक पाहणीचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ अशी आहे. त्यानंतर ग्रामस्तरीय समितीकडून २५ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. स्थळ पाहणीचे अहवाल ८ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करण्यात येतील. पुढे हे अहवाल १३ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.
ऑफलाईन पीक पाहणी नोंद पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान, नुकसानभरपाई व इतर मदतीचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पीक नोंद राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.




