
अमळनेर : शहरातल्या शाह आलम नगर भागात पोलिसांनी छापा टाकून ९ हजार ८२० रुपये किमतीचा २७ बंडल नायलॉन मांजा पकडून पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतंगाच्या नायलॉन दोऱ्याने आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले असून जनावरे ,पक्षी यांच्यासाठी देखील धोकादायक ठरले आहेत. म्हणून शासनाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. १८ रोजी सायंकाळी शाह आलम नगर मध्ये नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना मिळताच त्यांनी हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे , सुनील तेली , मयूर पाटील ,नम्रता जरे याना कारवाईसाठी पाठवले. जीलानी किराणाच्या बाजूला अब्दुल रहीम अन्सारी हा नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला. त्याच्याजवळून ६ हजार ३०० रुपये किमतीचे नऊ बंडल , ३ हजार रुपयांचे पाच बंडल , ५२० रुपयांचे बंडल असे एकूण ९ हजार ८२० रुपयांचे २७ बंडल पकडून अन्सारी विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५ , १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




