
अमळनेर :- आजच्या काळात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर, रिल बनविणे, रिल बघणे किंवा विविध ऑनलाईन गेम्समध्ये गुंतलेले दिसून येतात. मात्र याच मोबाईलचा अभ्यासासाठी सकारात्मक वापर करता येतो, हे अमळनेर येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या शुभम विलास पाटील या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथील शुभमने विद्यार्थ्यांसाठी ‘Mathpulse’ हे गणित शिकवणारे वेब अॅप तयार केले आहे.
विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण वाटतो, त्यामुळे त्यांची या विषयाबाबत भीती निर्माण होते. हीच बाब लक्षात घेऊन शुभमच्या मनात गेमच्या माध्यमातून गणित शिकवण्याची संकल्पना आली. मुलं जसे मोबाईलवर गेम खेळतात, त्याच पद्धतीने गणिती प्रश्न सोडवत गुण (पॉईंट्स) मिळावेत, यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे.
‘Mathpulse’ हे गणिती app तयार केले.या वेब अॅपमध्ये एकूण पाच लेव्हल्स असून, प्रत्येक लेव्हलमध्ये गणिती उदाहरणे व पाढ्यांचा सराव गेमच्या स्वरूपात करता येतो. योग्य उत्तर दिल्यास पॉईंट्स मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व आवड निर्माण होत आहे. शिवाय जर चुकीचे उत्तर दिले तर त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे. त्यामुळे मुलांना अतिशय सध्या सोप्या भाषेत समजेल असे app त्याने तयार केले आहे. इतर अपायकारक गेम्सपासून विद्यार्थी दूर राहून अभ्यासाकडे वळत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, हे वेब अॅप शुभमने HTML, CSS आणि JavaScript या संगणक भाषांच्या साहाय्याने स्वतः तयार केले आहे. p-mathpulse.vercel.app ही लिंक गुगलमध्ये टाकल्यावर हे अॅप सहजपणे सुरू होते.आपण ही link वापरून हे aap डाउनलोड करू शकतात. या अॅपच्या निर्मितीत शुभमला त्याचा मित्र तनय मनोहर पाटील (इ. ९ वी) याची मोलाची मदत लाभली. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळून अभ्यास व तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधला आहे. शुभमच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी कौतुक केले असून, अशा नवकल्पनांमुळे विद्यार्थ्यांचा गणितावरील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.




