
अमळनेर– तालुक्यातील मांडळ येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी सशस्त्र जिवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी अमळनेर तालुका ग्राम महसूल अधिकारी संघाच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या आवारात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
मांडळ परिसरात यापूर्वीही वाळू तस्करीशी संबंधित गंभीर गुन्हे घडले असून, त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करून एमपीडीए व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना मुद्देमाल व शस्त्रासह अटक होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार असून, या आंदोलनात ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून व नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत. निवडणूक व नैसर्गिक आपत्तीशी संबंधित अत्यावश्यक कामकाज वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
निवेदन देताना अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष एम. आर. पाटील, सचिव मुकेश देसले, संघटक विठ्ठल पाटील, विभागीय उपाध्यक्ष भूषण पाटील, जिल्हा प्रतिनिधी प्रवीण खंडारे, कार्याध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. या धरणे आंदोलन प्रसंगी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी धरणे आंदोलनादरम्यान चर्चा केली.




