
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली व कन्हेरे येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
भिलाली येथील प्रकाश भादेश्वर माळी (वय ३८) यांची पत्नी नांदत नसल्याने ते लहान भावाकडेच राहत होते. १८ रोजी सकाळी १० वाजता प्रकाश हा भिलाली शिवारातील नदीपात्रातील बुडालेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे काका व गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेत त्याला बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. दशरथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पारोळा येथील भोई गल्ली भागात राहणारा खुशाल सुकदेव भोई (वय ३८) हा कन्हेरे शिवारातील शेतातल्या विहिरीत तरंगताना दिसून आल्याची माहिती मिळाल्याने गावकरी सदर ठिकाणी गेले. त्याठिकाणी सदर इसम पाण्यावर तरंगताना दिसला व त्याच्या गळ्याभोवती मोटारीला बांधलेला दोर अडकलेला होता. पोलिसांच्या उपस्थितीत त्याला बाहेर काढले व अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.




