
पंचनामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची माजी आमदारांची मागणी
अमळनेर : तालुक्यातील बागायत कापूस उत्पादक बाधीत शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली आहे. अमळनेर तालुक्यात एकही बागायतदार शेतकरीचे नुकसान झाले नाही असे दाखवले असताना मात्र पारोळा तालुक्यात सर्वाधिक १५ हजार ८२३ हेक्टर क्षेत्र नुकसानीत बागायती दाखवण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम – २०२५ साठी तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालानुसार पिक लागवडीखालील क्षेत्र ६९ हजार ९५३ हेक्टर एवढे असून यापैकी कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र ३५ हजार ९९८ हेक्टर एवढे आणि जिरायत कापूस लागवड २२ हजार ४७४.३६ हेक्टर आणि बागायत कापूस क्षेत्र ९ हजार ४३३ हेक्टर एवढे आहे. तथापि, ऑक्टोबर – २०२५ मधील २७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीतील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करतांना १२ नोव्हेंबर २०२५ अन्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अंतिम संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल अप्पर आयुक्त, नाशिक आणि प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या अहवालानुसार अमळनेर तालुक्यातील कापूस लागवडीचे एकूण क्षेत्र ३५ हजार ९९८ हेक्टर पैकी २२ हजार ४७४.३६ हेक्टर एवढ्याच जिरायत क्षेत्राचा पंचनामा होऊन बागायत क्षेत्र ९ हजार ४३३ हेक्टर एवढ्या कापूस लागवड क्षेत्राचा हेतूपुरस्कार पंचनामे न करता बागायत कापूसधारक शेतकऱ्यांना नुकसानीपोटी शासकीय अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय कर्तव्यात विलंब आणि कर्तृत्व पालनातील कसूरीबाबत शासन निर्णयानुसार शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.
शासनाकडून खरीप पिकांसाठी जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी साडे आठ हजार रुपये तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी सतरा हजार रुपये मदत मिळणार आहे. मात्र अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हयात फक्त जामनेर आणि पारोळा तालुक्यात बागायती क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठवला आहे.
जामनेर तालुक्यात ३हजार १८९ हेक्टर क्षेत्र कापूस , २६२ हेक्टर मका बागायती नुकसान दाखवण्यात आले आहे तर पारोळा तालुक्यात १५ हजार ८२३ हेक्टर कापूस बागायती नुकसान दाखवले आहे. त्यामुळे पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीची मदत मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या सदोष अहवालामुळे अमळनेर तालुक्यातील बागायती क्षेत्राचे नुकसानच दाखवलेले नसल्याने ते मदतीपासून वंचित राहणार आहेत. आश्चर्य म्हणजे पारोळा तालुक्यात एकही कोरडवाहू जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले नाही.
अमळनेर तालुक्यातील १५५ गावे बाधित आहेत , पारोळा तालुक्यातील ९६ गावे बाधित आहेत. तर जामनेर तालुक्यात ६६ गावे बाधित आहेत.




