
अल्पवयीन चालकावर ही कारवाई, ४७ जणांना ६३ हजाराचा दंड…
अमळनेर : अल्पवयीन मुलांनी मोटरसायकल चालवल्याबद्दल, सायलेन्सरचा कर्कश आवाज केल्याबद्दल तसेच विविध प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल अमळनेर पोलिसांनी ४७ जणांवर कारवाई करून सुमारे ६३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२४ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नाकाबंदी लावून मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई सुरू केली. फरशी रोड , गलवाडे धार रस्ता ,दगडी दरवाजा , ग्लोबल शाळेजवळ एपीआय रवींद्र पिंगळे , हेडकॉन्स्टेबल संजय बोरसे , विनय पाटील ,रवींद्र बोरसे यांनी कारवाया केल्या.
यात १६ वर्षाआतील लहान चार मुले मोटरसायकल चालवताना आढळून आले. त्यांच्या पालकांना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याच प्रमाणे नंबर प्लेट नसलेल्या २० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तीन सीट जाणाऱ्या ७ वाहनांवर कारवाई करून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वाहन चालवण्याचा परवाना नसणाऱ्या ४ वाहनचालकांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे २० हजार रुपये दंड करण्यात आला. आणि परवाना असूनही वाहन चालवताना न बाळगणाऱ्या ९ जणांना ५ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. रस्त्यात वाहतुकीस अडथळा करणाऱ्याला ५०० रुपये दंड करण्यात आला.
डीवायएसपीनी सायलेन्सर काढले
फरशी पुलावर स्वतः डीवायएसपी विनायक कोते हजर होते. त्याचवेळी एक कर्कश आवाज करणारी मोटरसायकल आली. त्याला अडवून तेथेच गॅरेज वाला बोलावून त्याचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून त्याला जुने सायलेन्सर लावून ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
पालकांनी आपल्या अल्पवयीन मूलमुलींना मोटारसायकली देऊ नये. मुले मुले कॉलेजला किंवा शिकवणीला जाताना तीन ते चार सीट बसवून वेगात जातात. आता त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल- दत्तात्रय निकम , पोलिस निरीक्षक अमळनेर
रस्ता अडवणाऱ्यांवर कारवाई व्हावी
बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहने उभी राहतात , बस जायला सुद्धा जागा राहत नाही , रिक्षा अर्ध्या रस्त्यावर येतात. बालेमिया मशिदीजवळ फळ विक्रेते , हातगाड्या यांनी तर सर्व रस्ताच झाकून टाकला आहे. त्याचप्रमाणे बोरी नदी पूल तर बाजारपेठ झाला आहे. पैलाड नाक्यावर देखील वाहतूक अडवली जाते. त्याठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे. – सामान्य नागरिक ,अमळनेर




