
बसमध्ये मुलींची खोड काढत टवाळखोरी करणाऱ्या मुलांना पोलिसांनी भरला दम…
अमळनेर : शालेय विद्यार्थिनी सतर्क झाल्याने त्यांनी ११२ डायल करून बस थेट पोलिस स्टेशनला जमा करून टवाळखोराना पोलिसी खाक्या दाखवल्याची घटना २४ रोजी घडली.
२४ रोजी रणाईचे हुन अमळनेर येणाऱ्या बस मध्ये जानवे येथील शालेय मुली बसल्या. गावातली काही टवाळखोर अल्पवयीन मुले दररोज बस मध्ये आरडाओरडा करणे , मुलींची नावे घेणे , टोमणे मारणे असे प्रकार नित्याचेच झाले होते. मुली हतबल झाल्या होत्या. चालक वाहक देखील कंटाळले होते. अखेर मुलींनी धाडस करून चालत्या बसमधून ११२ डायल करून पोलिसांना तक्रार केली. बस अमळनेर येत नाही तोपर्यंत पोलीस पोहचले बस थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील , सागर साळुंखे यांनी सर्व टवाळ मुलांना पोलीस स्टेशन मध्ये आणले. सर्व मुले अल्पवयीन होती त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. पालकांसमोर मुलांची आणि मुलींची समजूत घालून यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची हमी घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले.




