
अमळनेर:-येथील तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी अमळनेर व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन, तालुका व शहरातील विद्यार्थी, मुले, मुली, कामगार, यांचा सोशल मीडियाचा गैरवापर व त्याअनुषंगाने तयार झालेली अवैध, बोगस सावकारी यावर निर्बंध घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याची तरुण पिढी, मुले, मुली, विद्यार्थी, कामगार हे सोशल मीडिया च्या वापराशिवाय राहू शकत नाही. किंबहुना ही पिढी सोशल मीडियाची व्यसनाधीन(habitual) झालेली आहे. अमळनेर तालुका व शहरातील शेतकऱ्यांची मुले, मुली, तरुण पिढी देखील याला अपवाद नाही. सोशल मीडियातील व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशांचा वापर शेतकऱ्यांची मुले मुली यांच्याकडून केला जात आहे. परंतु सोशल मीडिया मोफत, फुकट वापरता येत नाही, त्यासाठी पैसा मोजावा लागतो. त्यात ही जिओ सारख्या कंपन्यांनी आधी फुकट, नंतर कमी किमतीत, त्यानंतर जास्तीची किंमत आकारून या रमणीय दुःखात भर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडिया वापरण्यासाठी पैसा मोजावाच लागतो. त्यात शेतकरी, कामगार यांची आर्थिक परिस्थिती, सध्याच्या सरकारच्या आशीर्वादाने खिळखिळी झालेली आहे, डबघाईला आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले मुली, सोशल मीडिया वापरण्यासाठी चा पैसा, अवैध सावकारी धंद्याच्या माध्यमातून किंवा दबंगांकडून उधारी ने घेतात. उधारीने, व्याजाने म्हणण्यापेक्षा वेगळेच व्याज आकारण्यात येते. अशा धंद्यात मुद्दल सोडा, व्याज देखील दरमहा भरणे शक्य होत नाही. त्यामुळे दरमहा 25 टक्के 30 टक्के व्याज फेडण्यासाठी, पैसे परत करण्यासाठी, मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. नैराश्यातून नशा पाण्याच्या आहारी जातात. तसेच चोऱ्या, मारामाऱ्या करणे, अवैध धंद्यांच्या माध्यमातून पैसा मिळवण्याच्या प्रयत्न होतो. मुली छुप्या वेश्या व्यवसायाकडे, चोऱ्या करण्याकडे वळत आहेत.
शहरातील काही दुकानात ठेवले जातात मुलींचे मोबाईल
अशी दबक्या आवाजात चर्चा आहे की, शहरातील काही दुकानात, संध्याकाळी, खेड्यावरील मुलींचे मोबाईल ठेवले जातात. रात्रीतून मुले ती रिचार्ज करतात व सकाळी गावावरून, खेड्यावरून आल्यानंतर संबंधित मुली दिवसभर या मोबाईलचा (दूर) उपयोग, वापर करतात. अशा अनेक क्लुप्त्या सध्या शहरात, तालुक्यात सुरू आहेत. या संदर्भात शासन आणि प्रशासन स्तरावरून, बरबाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी, संदीप घोरपडे, गजेंद्र साळुंखे, प्रवीण रामलाल जैन, बन्सीलाल भागवत, हर्षल जाधव, संजय पवार तसेच एकलव्य सेनेचे कार्यकर्ते हजर होते.




