
अमळनेर : सावित्रीबाई फुले ,पंडिता रमाबाई ,डॉ रखमाबाई , कमलाताई सोहनी यासारख्या थोर महिलांचे कर्तृत्व मुलींना समजावून सांगा असे आवाहन ऍड रंजना पवार -गवांदे यांनी सावित्रीबाई फुले महिला महोत्सवात उपस्थित महिलांना केले.
अमळनेर नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व अमळनेर महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात २ ते ५ जानेवारी सावित्रीबाई महिला महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यावेळी “अंधश्रद्धा आणि ही महिला ” याविषयावर त्या बोलत होत्या.
ऍड पगार पुढे म्हणाल्या की , अंधश्रद्धा महिलेच्या जन्मापासून सुरू होते. तिचा जन्म अस्वागतार्ह मानला जातो. म्हणून मुलींचा जन्मदर कमी होतो. आणि म्हणून आजच्या मुलांना मुली मिळत नाहीत. यामागची कारणे म्हणजे मुलींची असुरक्षितता ,लग्नात केला जाणारा प्रचंड खर्च , मुलींनी विचार केला पाहिजे आपल्या पालकांना साध्या पद्धतीने लग्नाचा आग्रह आणि भावनिक आवाहन केले पाहिजे. मुलींनी देखील आता पालकांच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत.मुलगा मुलगी समानता ठेवली पाहिजे. समाजात व्रत ,वैकल्य ,उपवास यादेखील अंधश्रद्धा आहेत. महिलांनी सक्षम होण्यासाठी उपवास नव्हे तर सकस आहार घेतला पाहिजे. ज्या सावित्रीबाईनी विद्रोहाचे काम करून महिलेला आत्मविश्वास देऊन जगण्याचे बळ दिले. पंडिता रमाबाई यांनी संस्कृत शिकल्या म्हणून त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणाऱ्या समाजाच्या विरोधात बंड पुकारले , बालवयात लग्न लावले म्हणून अडाणी व्यक्तीबरोबर नांदायला जायला नकार देऊन डॉ रखमाबाई यांनी न्यायालयाच्या आदेशाने त्याकाळी नवऱ्याला पोटगी दिली. पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहनी , पहिल्या महिला वकील कॉर्नेलीया सोराब यासारख्या महिलांना संघर्ष करावा लागला त्यांचा आदर्श महिलानी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.
व्यासपीठावर महिला मंच च्या अध्यक्षा डॉ अपर्णा मुठे , कांचन शहा , तिलोत्तमा पाटील , विद्या हजारे ,करुणा सोनार , सरोज भांडारकर वसुंधरा लांडगे , माधुरी पाटील आदी पदाधिकारी तर कार्यक्रमास शहरातील महिला हजर होत्या.




