
अमळनेर : आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास विभाग, अमरावती यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी १०० मीटर धावणे ,लांब उडी , थाळी फेक आणि ४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन या स्पर्धांचे उद्घाटन विजय वाघमारे (सचिव, आदिवासी विकास, महाराष्ट्र) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्वेता सिंघल ( विभागीय आयुक्त, अमरावती विभाग), तसेच पवनश्री प्रभावकर वैद्य, (प्रधान सचिव, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ) विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास रविंद्र ठाकरे,( आयुक्त, राज्य माहिती आयोग, अमरावती,) आशीष पाटील, (जिल्हाधिकारी, अमरावती), राकेश ओला ( पोलीस आयुक्त अमरावती) , सोनिया शर्मा चांडक ( आयुक्त, मनपा, अमरावती), तसेच लिना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक), आयुषी सिंह ( अप्पर आयुक्त, अमरावती), दिनकर पावरा, (अप्पर आयुक्त, नाशिक) उपस्थित होते.
या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिक, अमरावती, ठाणे व नागपूर या चार विभागातील खेळाडू सहभागी झालेले होते. या स्पर्धेत अनुदानित आदिवासी आदर्श आश्रमशाळा पिंपळे बु. येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. वासुदेव भिमसिंग पावरा (१९ वर्ष वयोगट) याने दुहेरी मुकुट मिळवत १०० मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले. रोशनी लक्ष्मण पावरा (१८ वर्ष वयोगट) हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक, तर राजकिरण अमाश्या पावरा (१४ वर्ष वयोगट) याने ४०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंना उच्च माध्यमिक विभागाचे मुख्य प्रशिक्षक व उपक्रमशील शिक्षक स्वप्नील पाटील व प्राथमिक शिक्षक दिपक नांद्रे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई युवराज पाटील, संस्थेचे सचिव व शैक्षणिक सल्लागार युवराज पाटील , संचालक ॲड. श्री. अभिजित पाटील, यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, अरुण पवार तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे,पवन पाटील, संदीप पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक ,उदय पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी विजयी खेळाडूंचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.




