
102 नागरिकांची तपासणी, 14 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची संधी
अमळनेर : लायन्स क्लब अमळनेर, नर्मदा मेडिकल फाउंडेशन अमळनेर आणि एसएमबीटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हृदयरोग तपासणी शिबिरास अमळनेरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी अस्मी सीटी स्कॅन व डायग्नोस्टिक सेंटर परिसरात झालेल्या या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
लहान मुलांसाठी (वय 0 ते 18 वर्षे) मोफत हृदयरोग तपासणी व 2D इको सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर प्रौढांसाठी केवळ 50 रुपयांत नाव नोंदणी, तसेच ईसीजी, शुगर आणि बीपी तपासणी विनामूल्य केली गेली. 2D इको तपासणी अत्यल्प दरात म्हणजे 500 रुपयांत उपलब्ध होती. हृदयरोग तज्ञांच्या उपस्थितीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तपासणी प्रक्रिया पार पडली. एकूण 102 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. यांपैकी १४ रुग्णांना मोठी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदान झाले असून, त्यांना 26 जानेवारी रोजी नाशिक येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य नेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्चही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. ऋषिकेश तामसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सूर्यकांत पाटील, नितीन कोळी, प्राची सोनवणे व दिपीका साबळे यांनी उत्कृष्ट सेवाभाव दर्शवत कार्य पार पाडले.यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष डॉ.संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन मनिष जोशी,प्रदीप जैन,सुनिल चौधरी, एसडि भरुचा,रवींद्र कॉलरा,डॉ. मिलिंद नवसारीकर,पंकज मुंदडा, डॉ. रवींद्र जैन, प्रकाश शहा, चंद्रकांत महाजन,शेखर धनगर,यांच्यासह लायन्स सदस्य उपस्थित होते. लायन्स क्लब आणि नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त पुढाकारामुळे हृदयरोगाबाबतची जनजागृती, लवकर निदान आणि योग्य उपचारासाठी दिशा मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.




