
अमळनेर: “जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कठीण परिस्थितीवरही मात करता येते,” हे अमळनेरच्या एका तरुण मल्लाने सिद्ध करून दाखवले आहे. शहरातील अनमोल सुपर शॉपसमोर छोटेसे चहाचे दुकान चालवणारे वसंत (बापू) चौधरी यांचा मुलगा चि. योगीराज वसंत चौधरी याची पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवर होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी २०२६’ कुस्ती स्पर्धेसाठी ६५ किलो वजनी गटात निवड झाली आहे.
योगीराजची ही निवड अमळनेरकरांसाठी विशेष कौतुकाची ठरत आहे. त्याचे वडील अत्यंत कष्टकरी असून, चहाचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही, योगीराजने कुस्तीप्रती असलेली आपली ओढ कमी होऊ दिली नाही. दिवसातील तासनतास लाल मातीत घाम गाळून त्याने हे यश संपादन केले आहे.
बालेवाडीच्या मैदानात दाखवणार कसब
पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल (बालेवाडी स्टेडियम) येथे होणाऱ्या या मानाच्या स्पर्धेत योगीराज आता अमळनेरचे प्रतिनिधित्व करेल. ६५ किलो वजनी गटात त्याची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
योगीराजच्या या यशामुळे केवळ चौधरी परिवाराचीच नव्हे, तर संपूर्ण अमळनेर शहराची मान उंचावली आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने राज्यस्तरावरील सर्वात मोठ्या कुस्ती स्पर्धेत स्थान मिळवणे, हे शहरातील इतर होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
“माझ्या मुलाने पाहिलेले स्वप्न आणि त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.” — वसंत (बापू) चौधरी (योगीराजचे वडील)




