
बजरंग दल प्रखंड विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षकांना निवेदन…
अमळनेर :-येथील धार्मिक स्थळावर दगडफेक व शुभम दिलीप वाणी याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा या मागणीचे निवेदन बजरंग दल प्रखंड विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
यात म्हटले आहे की दि. 9 जानेवारी रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास, साळीवाडा, अमळनेर येथील रहिवासी शुभम दिलीप वाणी हा आपल्या घरी असताना काही समाजकंटकांनी त्याच्या घरी येऊन त्याला घराबाहेर चौकात बोलावले. त्यानंतर काहींनी पूर्वनियोजित कट रचून परिसरातील हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या धार्मिक स्थळावर दगडफेक करून धार्मिक तेढ निर्माण कर प्रयत्न केला. यानंतर सदर आरोपींनी शुभम वाणी याच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने सामूहिक हल्ला केला. या हल्ल्यात लोखंडी रॉड, चॉपर, चाकू व दगडांचा वापर करून शुभम यास बेदम मारहाण करण्यात आली असून तो अत्यंत गंभीर जखमी झाला आहे. सदर प्रकार हा केवळ मारहाणीचा नसून खुनाच्या प्रयत्नाचा, दंगल भडकावण्याचा व धार्मिक भावना दुखावण्याचा गंभीर गुन्हा आहे.मात्र या घटनेस अनेक दिवस उलटूनही एकही आरोपी अटकेत नसणे, तसेच तपासात अपेक्षित गती नसणे, हे अत्यंत गंभीर बाब असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर राजकीय अथवा अन्य बाह्य दबाव असल्याची शंका निर्माण होत आहे. या घटनेमुळे अमळनेर शहरातील हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.तरी सदर प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.IPC अंतर्गत खुनाचा प्रयत्न, दंगल, धार्मिक तेढ निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशी कठोर कलमे लावण्यात यावीत. प्रकरणाचा वेगवान, निष्पक्ष व पारदर्शक तपास करून पीडित कुटुंबास न्याय देण्यात यावा. अन्यथा, या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर सामाजिक संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होतील, याची पूर्वसूचना देत तात्काळ लक्ष घालून योग्य ती कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर विहिप चे प्रखंड मंत्री सचिन चौधरी, विनायक चौधरी,हिंदू जागरण मंच चे युवा प्रमुख विजय धनराज पाटील,सागर बारी व योगीराज चव्हाण आदींच्या सह्या आहेत.




