
अमळनेर(प्रतिनिधी):- मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी गावातीलच एकाला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पोक्सो अंतर्गत २० वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील ढेकू बु. येथील संशयित दीपक नाना भील (वय २६) याने जानेवारी २०२२ व लगतच्या काळात आपल्याच घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मूकबधिर पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध बनवले.यामुळे पीडिता ही साडे पाच महिन्याची गर्भवती राहिली.
याबाबत पीडितेच्या वडिलांनी ३० जानेवारी २०२२ मध्ये संशयिताविरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार नोंदविली.तत्कालीन पोलिस अधिकारी नरसिंग वाघ यांनी तपास केला.
जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल.डी.गायकवाड यांच्यासमोर सदरच्या खटल्याचे कामकाज चालले.सरकारी वकील किशोर बागुल यांनी तब्बल ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यात पीडितेची आई,गावातील पोलिस पाटील,ग्रामीणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम.पाटील व डॉ.अनिता देशमुख यांची साक्ष महत्वाची ठरली.
पीडिता ही मूकबधिर असल्याने तसेच तिला लिहिता वाचता येत नसल्याने तिची साक्ष महत्वाची होती यासाठी कोर्टाने तिच्या लिहिणे,वाचणे तसेच समजून घेणे याकामी विशेष शिक्षकाची नियुक्ती केली होती.त्यामुळे तिची साक्ष घेणे सोपे झाले.पीडितेची साक्ष व्हिडिओग्रफी द्वारे बंद दाराआड नोंदविण्यात आली. पीडितेचा गर्भातील बाळ आणि संशयिताची डीएनए चाचणी देखील पुराव्याकामी महत्वाची ठरली.सदर खटल्याचे कामकाज सुरू असल्यापासून संशयित कारागृहात होता.
सरकारी वकील किशोर बागुल यांनी सर्व पुराव्यांचा आधार घेऊन युक्तिवाद केला यामुळे न्यायालयाने
संशयिताला बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दोषी धरले, पोक्सो अंतर्गत आरोपीला २० वर्षाची शिक्षा व १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.यापैकी ७ हजार रुपये पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
याकामी पेरवी अधिकारी पोहेकॉ पुरुषोत्तम वाल्हे,पोलिस उपनिरीक्षक उदयसिंग साळुंके,पोहेकॉ प्रमोद ,पोकॉ राहुल रणधीर,पोहेकॉ भरत इशी,पोकॉ सतीश भोई यांचे सहकार्य मिळाले.




