
शिरूड येथील डॉ.सौ शिल्पा सौरभ सांगोरे झाल्यात मुंबई महापालिकेच्या नगरसेविका
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील सूनबाई असलेल्या डॉ.सौ शिल्पा सौरभ सांगोरे यांनी मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकविला असून नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या वतीने नगरसेविका म्हणून मोठ्या फरकाने त्या विजयी झाल्या आहेत.
शिरूड येथील रहिवासी स्वर्गीय भिला भुता सांगोरे यांच्या त्या स्नुषा तर मुंबईत स्थायिक झालेले डॉ.सौरभ भिला सांगोरे यांच्या त्या धर्मपत्नी आहेत.बोरिवली भागात ते स्थायिक असून तेथिल प्रभाग क्रमांक 17 मधून महिला राखीव जागेतून भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती.चांगल्या कामगिरीमुळे सुरवातीपासून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना होता. त्यांच्या प्रचारासाठी अमळनेर तालुक्यातील असंख्य हितचिंतक, मित्रपरिवार आणि नातलगानी मुंबई गाठली होती.अखेर निकालाच्या दिवशी सुमारे 14 हजार पेक्षा अधिक मताधिक्याने त्यांचा विजय झाला.त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराचा पराभव झाला.डॉ.सौ सांगोरे यांच्या रूपाने सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर प्रथमच अमळनेर तालुक्याचा झेंडा रोवला गेल्याने संपूर्ण अमळनेर तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ.सौरभ सांगोरे यांनी धुळे येथे एमबीबीएस केल्यानंतर स्त्रीरोग शास्त्राची पदविका घेऊन काही दिवस अमळनेर येथे सेवा दिली.त्यानंतर थेट मुंबई गाठून त्याठिकाणी स्वकर्तुत्वाने प्रचंड मेहनतीने वैद्यकीय क्षेत्रात मोठे वलय निर्माण केले.आज मुंबई परिसरात फिनिक्स ग्रुप च्या माध्यमातून चार ते पाच भव्य असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्यांचे असून मोठे सामाजिक कार्य त्यांचे आहे.भाजपा वैद्यकीय आघाडीचे त्या परिसराचे ते जिल्हाध्यक्ष देखील आहेत.खासदार पियुष गोयल,माजी खा. गोपाल शेट्टी यासह अनेक बड्या नेत्यांचे मोठे सहकार्य त्यांना मिळत असते.त्यांच्या पत्नी डॉ शिल्पा सांगोरे यांचेही वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य असून अत्यंत गुणी व हुशार महिला नेत्रुत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.वाढते राजकीय वलय पाहता भविष्यात हे सांगोरे दाम्पत्य मुंबईत खूप मोठे यशोशिखर गाठणार असा विश्वास अमळनेर येथील मित्र परिवाराने व्यक्त केला आहे.




