
अमळनेर:-शहरातील ढेकू रोडवर वास्तव्यास असलेले खाजगी शाळेचे शिक्षक सुरेश सिताराम सोये यांचा काल दिनांक 18 रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे अपघातातात मृत्यू झाल्याची घटना चांदणी कुर्हे गावाजवळ सती माता मंदिराजवळ घडली.
ते न्यु इंग्लिश स्कूल नांदेड येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.तर त्यांच्या पत्नी श्रीम. प्रमिला मोरे या जि. प.शाळा निपाने ता. एरंडोल येथे प्राथमिक शिक्षिका आहेत.मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी घरातून ते अचानक बेपत्ता झाले होते,कोकणात ते सापडल्याने तेथून त्यांना परत आणले होते.दोन ते तीन दिवस घरीच थांबल्यावर काल सकाळी घरातून ते बाहेर पडले आणि सती माता मंदिराजवळ घटनास्थळी पोहोचले तेथे हावडा अहमदाबाद रेल्वे गाडी खाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.गळ्यातील चेन व अंगठी यावरून त्यांची ओळख पटली.अमळनेर ग्रामिण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेने ढेकूरोड परिसरात शोककळा पसरली.चोपडा तालुका पंचक येथील ते मूळ रहिवासी असून रात्री उशिरा अमळनेर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




