
अमळनेर : “हिंद-की-चादर” म्हणून गौरविल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातून मोठ्या उत्साहात भाविक नांदेडकडे रवाना झाले.
महाराष्ट्र शासन व गुरूनानक नामलेवा संगत यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या समागमात शिख, सिखलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मीकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी) समाजांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव व सोलापूर अशा १२ जिल्ह्यांतील तसेच अमळनेर तालुक्यातील वंजारी तांडे, ढेकू, रानईचा, रामेश्वर, येथून वंजारा समाजबांधव सहभागी झाले आहेत आहेत.
सदर कार्यक्रमासाठी अमळनेर उपविभागीय कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून भाविकांना मंगलमय शुभेच्छा देत आनंदात रवाना करण्यात आले. यावेळी जवळपास २०० भाविक नांदेडकडे प्रयाण केल्याने परिसरात भक्तीमय व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तसेच गिरीष कुलकर्णी, संतोष माणिक, सरजु सेठ गोकलांनी, प्रीतपाल सिंग बग्गा, कृपाल सिंग लुल्ला, प्रितराज बग्गा, अशोक माधवानी, राजु वाधवाणी, संजय बितराई, अशोक माधवानी,यांच्यासह असंख्य सेवक उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाची आठवण करून देणारा हा समागम समाजात एकोपा, श्रद्धा व सेवाभाव वृद्धिंगत करणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




