
आता ग्राम महसूल अधिकारी सहाय्यकांच्या मदतीने पीक पाहणी करणार
अमळनेर : रब्बी हंगामाची पीक पाहणी करण्याची मुदत शेतकरी स्तरावर संपली असून आता ग्राम महसूल अधिकारी सहाय्यकांच्या मदतीने पीक पाहणी करणार असून सहाय्यकांना एकल पिकासाठी प्रति प्लॉट १० रुपये तर मिश्र पिकासाठी प्रति प्लॉट १२ रुपये मानधन देण्यात येणार आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे म्हणून केंद्र शासनाची ऍग्रीस्टॅक योजना राबविण्यात येते. या योजनेनंतर्गत राज्यातील शेतकरी माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) , हंगामी पिकांचा माहिती संच(क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भीकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच असे तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येत आहेत. याकरिता हंगामी पिकांचा माहिती संच अंतर्गत पीक पाहणीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे राबवण्यात येत आहे. डिसीएस या मोबाईल ऍप च्या माध्यमातून शेतकऱ्याद्वारे प्रथम याचा वापर करण्यात येतो. नंतर तलाठी त्यांच्या गावात तहसीलरांकडून नेमलेल्या सहाय्यकांच्या माध्यमातून उर्वरित पीक पाहणी पूर्णकरून घेण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्यात एकूण ७६ हजार प्लॉट आहेत. त्यापैकी शेतकरी स्तरावर फक्त १६ हजार प्लॉटची पीक पाहणी प्रयोग झाले आहेत. अजूनही सुमारे ५९ हजार प्लॉट चा पीक पाहणी प्रयोग बाकी आहे.
गावातील कोणीही सुशिक्षित तरुण ज्याला मोबाईल चे ज्ञान अवगत आहे तो सहाय्यक म्हणून काम करू शकतो. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्याने जिओ टॅगिंग करून प्रत्यक्ष पिकाचे फोटो काढून पीक पाहणी करून डिसीएस ऍप वर नोंद करायची आहे. यासाठी त्याला एकल पिकाला प्रति प्लॉट १० रुपये आणि मिश्र पिकाला प्रति प्लॉट १२ रुपये मानधन मिळणार आहे.- रुपेशकुमार सुराणा , तहसीलदार अमळनेर.




