
अमळनेर :- शहरातील कसली मोहल्ल्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप पाहता परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या शांततेत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. लोकप्रतिनिधी व नागरिकांची तत्काळ मदत आगीची बातमी समजताच परिसरातील माजी व विद्यमान नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. केवळ उपस्थित न राहता त्यांनी प्रत्यक्ष आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. फिरोज पठाण, नासिर हाजी, नवीद शेख, नाना धनगर, गुलाम नबी, इमरान शेख, अरमान हलवाई, वसीम पठाण, तय्यब पठाण, रिजवान मनियार, नईम पठाण, छोटू भोई, सुपडू मणियार आदींनी अग्निशामक दलाला मोलाची मदत केली. पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे तसेच आग पसरू नये यासाठी सुरक्षित अंतर राखण्याचे काम नागरिकांनी केले. अरुंद गल्ली, धुराचे लोट आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आग आसपासच्या घरांपर्यंत पोहोचण्याआधीच आटोक्यात आणण्यात यश आले.




