
आजोबा स्व.वसंतराव गुरव यांचा संगीत वारसा जोपासण्याचा प्रयत्न…
अमळनेर:-ज्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शहनाई वादक म्हणून नावलौकिक मिळविले ते स्वर्गीय वसंतराव गुरव यांची नात व ज्यांनी वडिलांचा शहनाई वादनाचा वारसा पुढे नेला ते प्रसिद्ध कलाकार प्रबल उर्फ चिमु गुरव यांची सुकन्या कु. अनोखी प्रबल गुरव हिने आजोबा व वडिलांचा वारसा जपत संगीत क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तिने अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या “हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयात मुंबई केंद्रातून” पहिली येण्याचा मान पटकावला आहे. या कठीण परीक्षेत तिने सभागायनात “शुद्ध कल्याण” हा राग प्रस्तुत केला. व उपशास्त्रीय प्रकारात ठुमरी सादर करून परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. तिने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून या परिक्षा देण्याची सुरुवात केली होती. “पूर्व प्राथमिक ते विशारद या अशा 8 स्तरांच्या परिक्षेत तिने सलग ‘विशेष योग्यता ( Distinction) मिळवून गेल्या डिसेंबर 2025 मध्ये वयाच्या अवध्या 17 व्या वर्षी “संगीत विशारद होवून यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सगळीकडून तिचे कौतुक होत असले, तरी देवाच्या कृपेने मिळालेल्या या यशाचे सारे श्रेय तिने आपल्या गुरूंना व आपल्या आई-वडील व कुटुंबाला दिले आहे. पुढे अशा अनेक वेगवेगळ्या परिक्षांना सामोरे जाण्याची संधी अनोखी घेणार असून या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होऊन आजोबा व वडिलांचा संगीत वारसा सुरू ठेवल्याबद्दल कौतुकही होत आहे.




