
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या २४ वाहनांचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी करण्याचा आदेश तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी काढला आहे.
तालुक्यातील तापी,पांझरा व बोरी नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असते.याला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे विविध उपाययोजना तसेच मोहीम राबविल्या जातात.मागील काही वर्षापासून महसूल प्रशासन,पोलिस प्रशासनाकडून ११ ॲपेरिक्षा व १३ ट्रॅक्टर जमा करण्यात आलेले आहेत. ही जमा केलेली वाहने तहसील कार्यालय,शासकीय धान्य गोदाम तसेच पोलिस स्टेशन च्या आवारात लाऊन ठेवलेली आहेत.सदर वाहन मालकांना दंडात्मक नोटीस व आदेश देऊन देखील त्यांनी दंडात्मक रकमेचा भरणा केलेला नसल्याने महसूल अधिनियमानुसार या वाहनांचा लिलाव करून लिलावातून प्राप्त होणारा महसूल शासनास जमा केला जाणार आहे.या वाहनांचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी काढले आहेत.




