
शहरातील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्यामुळे उघड्यावर साचतेय दूषित पाण्याचे तळे….
अमळनेर -शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ६६ कोटी रुपयाची भुयारी गटार योजनेचे बांधकाम नऊ वर्षापासून ठेकेदाराकडून संथगतीने केले जात असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी सतत ड्रेनेजच्या चोकअपमुळे शहरातील सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील मुख्य रस्ता असलेला गलवाडेरोड वरील प्रमुख पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगत भुयारी गटार योजनेचे चेंबर महिन्याभरापासून चोकअप झाले असून या चेंबरचे पाणी रस्त्याच्या कडेला साचले आहे. या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. या भागातील रहिवाशांच्या सुविधेसाठी पालिकेने भुयारी गटार योजनेची ड्रेनेज लाइन टाकली होती. परंतु या ड्रेनेज लाइनची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. भुयारी गटारचे चेंबर फुटले असून त्यातील दूषित पाणी रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या मैदानावर जमा होत आहे. या मैदानाच्या शेजारीच ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा आहे.
या शाळेत ये- जा करणाऱ्या पालकांसह विद्यार्थी आणि रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांना या दूषित शेवाळयुक्त पाण्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत असून ड्रेनेजची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी. तसेच सदर योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.




