
अमळनेर :- प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे येथे दिनांक ६ रोजी कॅन्सर तपासणी व्हॅनच्या माध्यमातून विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भूषण पाटील यांनी स्तन व गर्भाशयमुख (ग्रीवा) कर्करोगाची तपासणी केली, तर दंत शल्यचिकित्सक डॉ. सुमित पाटील यांनी मुखाच्या कर्करोगाची तपासणी करून रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन केले. या शिबिराचा एकूण २२८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कर्करोगाचे लवकर निदान होऊन वेळीच उपचार मिळावेत, या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीदरम्यान संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारांसाठी संदर्भ देण्यात आले.
हे शिबिर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रनाळकर व डॉ. रिया शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी डॉ. अतुल चौधरी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




