
अपघातात अनेक वन्यप्राण्यांचे गेलेत जीव,मात्र उपाययोजना काही होईना
अमळनेर :- तालुक्यातील डांगर येथील शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका निलगायचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आतापर्यंत अपघातात अनेक वन्यप्राण्यांचे जीव गेले जीव गेले असताना वन विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्याही उपाय योजना करीत नसल्याचा आरोप उदय नगर चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ यांनी करत वन्य क्षेत्राच्या लगत असलेल्या रस्त्यावर वन्य जीवांचे रक्षण व्हावे यासाठी वाहने हळू चालविण्यासंदर्भात फलक लावले जावेत अशी मागणी प्रकाश वाघ व राजेश वाघ यांनी केली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रकाश वाघ, राजेश वाघ, योगेश पाटील यांनी तत्काळ वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांना कळविले. वनरक्षक वानखेडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तपासणी केली. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई वनविभागामार्फत करण्यात येत आहे.या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी वेगाने वाहने जात असल्याने वन्यजीवांसह नागरिकांनाही धोका निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




