
बिल्डर सरजू गोकलानी सह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर:-शहरातील न्यू प्लॉट भागात 75 ते 80 वर्षांपासून भाड्याच्या घरात एका कुटुंबाचा रहिवास असताना त्यांची कोणतीही संमती न घेता जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे त्यांचे घर जमीनदोस्त करणे,सामानाचे नुकसान करणे शहरातील एका नामांकित बिल्डरला चांगलेच भोवले असून सदर प्रकरणी बिल्डर सरजू गोकलानी सह पाच ते सहा जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे.याबाबत अधिक असे की न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ,टीपी नंबर 45/01 येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन रूम चे लोखंडी पत्र्याचे भाड्याचे घर असून येथील वीज कनेक्शन व नळ कनेक्शन त्यांच्याच नावावर आहे.त्यांच्या कुटुंबाचा 75 ते 80 वर्षापासून या घरात रहिवास आहे.दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 06.30 वाजेच्या सुमारास त्यांची कोणतीही समंती नसतांना सरजु गोकलानी यांचे सांगण्यावरुन त्यांचे 4 ते 5 इसम व महेश देशमुख सर्व रा अमळनेर आदींनी शिंदे यांची कोणतीही समंती नसतांना त्यांचे घरात प्रवेश करुन संपूर्ण घर जेसीबी ने पाडुन जमीनदोस्त केले.व त्या रुम मध्ये असलेले लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक, स्टीलचा रॅक, गॅसची स्टीलची शेगडी, कुलर, 2 फॅन असे अंदाजे 20,000/-रुपये किमतीच्या सामानाचे नुकसान करुन शिवीगाळ व दमदाटी केली.त्यामुळे शरद शिंदे यांनी सरजु गोकलानी, त्यांचे 4ते 5 इसम व महेश देशमुख यांचेविरुध्द अमळनेर पोलिदात कायदेशिर फिर्याद दिल्याने वरील सर्वाविरुद्ध भादवी कलम 329(3),329(4),324(4),352,351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोउपनि समाधान गायकवाड हे करीत आहेत.
पीडित दाम्पत्याचा पुत्र देशसेवेत
ज्यांचे घर पाडले गेले त्या शिंदे दाम्पत्याचा मुलगा नयन शिंदे हा सीआरपीएफ मध्ये देशसेवेत कार्यरत असून तो आपल्या कर्तव्यावर असताना घर पाडले गेल्याने त्यानेही जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तसेच अमळनेर येथील माजी सैनिक संघटनेचे सदस्य देखील शिंदे यांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात धावून गेले होते,यामुळे पोलिसांनी योग्य ती ऍक्शन तातडीने घेतली.




