
रक्तदान शिबिरात रक्तदात्याला स्मार्ट वॉच आणि हेडफोन मिळणार…
अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक नगर तर्फे १९ रोजी अमळनेरात भव्य राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्याला स्मार्ट वॉच ,हेडफोन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
घराघरात शिवाजी जन्माला यावेत जिजाऊ निर्माण व्हाव्यात म्हणून अष्टविनायक नगर तर्फे १५ ते १९ दरम्यान भव्य शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १५ ते १९ दररोज मोफत लाठ्या काठ्या प्रशिक्षण दिले जात आहे. विविध शाळामध्ये देखील लाठ्या काठ्या मुलांना शिकवले जात आहे. १५ रोजी वसंत हंकारे यांचा बाप समजून घेताना यावर व्याख्यान होऊन तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आली. १६ रोजी प्रा डॉ पंडित घनश्याम थोरात यांचे शिवव्याख्यांन आणि शिवगीतांचा कार्यक्रम झाला. १७ रोजी शिवशाहीर स्वप्नीलजी डुंबरे यांचा शिवशाहिरी व पोवाडे कार्यक्रम ,१८ रोजी शिवव्याख्याते निकिता पंढरीनाथ भदाणे यांचा ” प्रतापगडाचा महारणसंग्राम- अचूकवेध” यावर व्याख्यान होणार आहे.
तर १९ रोजी महिला आणि पुरुष दोघांसाठी स्वतंत्र मॅरेथॉन स्पर्धा होणार असून सकाळी ८ वाजता ही स्पर्धा अष्टविनायक नगर येथून सुरू होणार आहे. दोन्ही गटांसाठी प्रथम बक्षिस ७ हजार रुपये ,दुसरे बक्षीस ५ हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ३ हजार रुपये असेल. स्पर्धेचे संयोजक म्हणून संजय पाटील ,सुनील वाघ काम पाहत आहेत.
त्याचप्रमाणे १९ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यास स्मार्ट वॉच आणि हेडफोन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे यासाठी जीवन ज्योती ब्लड बँक व रोटरी ब्लड बँक पनवेल यांचे सहकार्य लाभत आहे.




