
अमळनेर:- तालुक्यातील कंडारी खुर्द येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्पाचे शेती शाळेचा वर्ग संपन्न झाला. शिवशंभो शेतकरी बचत गटातर्फे प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून लोकेश विष्णू पाटील यांच्या शेतात शेती शाळेचा वर्ग घेण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे,मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. रब्बी ज्वारीचे रोग व कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, काढणी पश्चात विक्री बद्दल उपकृषी अधिकारी प्रवीण पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले. महाविस्तार एआय ऍपचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी एक डिजिटल मित्र म्हणून करावा असेही त्यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करून पिकांचा उत्पादन खर्च कमी करावा आणि उत्पादनात वाढ करावी तसेच आपल्या शेतीमध्ये एकाच पिकाचा अवलंब न करता कडधान्य सहित इतर पिकांची लागवड करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ठाकरे यांनी केले. त्यानंतर खरीप हंगामातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य अंतर्गत तूर पिकाच्या सुवर्णयुग शेतकरी बचत गटाने नावीन्यपूर्ण बाबींचा अवलंब आणि उत्कृष्ट पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन केल्यामुळे ‘उत्कृष्ट गट’ म्हणून नाशिक विभाग स्तरीय तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल गटातील शेतकऱ्यांचे अभिनंदन ठाकरे यांनी केले. शेतकरी गटाचे अध्यक्ष विकास पाटील आणि इतर सदस्य विष्णू पाटील, सुभाष पाटील, जीवन पाटील, राजेंद्र पवार, सुधाकर पाटील, मधुकर पाटील,योगेश पाटील गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी अनिकेत सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी प्रफुल्ल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी चेतन चौधरी, नवल वाघ, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.




