
अमळनेर : श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल येथे आज शिवजयंतीचे औचित्य साधून उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण जीवनपट देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडला.
कार्यक्रमात शिवजन्म, राजमाता जिजाऊंची शिवबाला दिलेली संस्कारमय शिकवण, रायरेश्वर येथे स्वराज्याची घेतलेली शपथ, ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे’ ही महाराजांची ध्येयदृष्टी, स्त्री-सन्मानाचा तेजस्वी आदर्श, धर्म-जातीपलीकडे सर्वांना एकत्र बांधणारा लोककल्याणकारी राजा, मावळ्यांसह लढणाऱ्या मराठा वीरांची शौर्यगाथा तसेच भव्य शिवराज्याभिषेक अशा प्रसंगांचे सजीव सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयकौशल्याने आणि नेपथ्याच्या प्रभावी मांडणीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती, शौर्य व सामाजिक समतेचे संस्कार रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पालक, शिक्षक व मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




