
अमळनेर : शेतातील मधमाश्यांचे पोळे झेलायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मधमाशा चावून मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सायंकाळी लोंढवे येथे घडली.
राहुल कैलास पाटील वय १९ हा सायंकाळी धुळे अमळनेर रस्त्यालगत त्याच्या शेतात असलेले मधमाश्यांचे पोळे झेलण्यासाठी गेला. मधमाशा चावू नये म्हणून त्याने त्याच्या तोंडावर प्लास्टीक पिशवी डोक्यातून घालून त्याला गाठ मारून घेतली. त्याने मध झेलायला सुरुवात करताच मधमाशा चवताळल्या आणि त्याला जोरजोराने चावा घ्यायला सुरुवात केली. तसा राहुल पळत सुटला. त्याने मधमाशा तोंडावर येऊ नये म्हणून पिशवी घट्ट धरली. पळता पळता तो खाली पडला. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच त्यांनी त्याला डॉक्टर अनिल शिंदे यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या चुलत भावाने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्याबरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.




