
अमळनेर:- तालुक्यात दहिवद व करणखेडा शिवारात दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

२ रोजी विटनेर (ता. चोपडा) येथील पंढरीनाथ विठ्ठल पाटील (वय ४८) हे त्यांच्या दुचाकीने टाकरखेडा येथे जात असताना दहिवद गावच्या अलीकडे समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने (वाहन क्रमांक एमएच १९ डिझेड १६४०) भरधाव वेगाने धडक दिल्याने पंढरीनाथ यांच्या डोक्याला व पोटाला मार लागून ते अपघातात मयत झाल्याने सदर दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ सुनील जाधव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत ८ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास करणखेडा येथील मुकेश बारकु पवार (वय ३५) हा हिरो स्प्लेंडर दुचाकीने (क्रमांक एमएच १९ एएस ४०८३) मारवडहून करणखेडा जात असता झाडाला दुचाकी ठोकली जाऊन डोक्याला मार बसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




